प्रतिनिधी - प्रदीप कुलकर्णी, व राज चौधरी, सावदा
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सव प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. यंदा तर निर्बंधमुक्त गणेशोत्सव आहे. त्यामुळे सर्वत्र उत्सवाचं वातावरण निर्माण झालं आहे. गणपतीचं घरा-घरात आगमन होणार आहे. 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा आणि भक्ती केली जाणार आहे. विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जाणार आहेत. गणपतीची मूर्ती घरी केव्हा आणावी, याबाबत आम्ही महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे.
गणपती बाप्पाची कशी मूर्ती घरी आणावी?
हिंदू धर्मातील जाणकार सांगतात की, घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यापूर्वी तिची सोंड जरुर पाहून घ्या. ज्या गणेशाची सोंड उजवीकडे वळलेली आहे ती सिद्धीपीठाशी निगडीत आहे. याला दक्षिणामूर्ती किंवा दक्षिणाभिमुख मूर्ती असेही म्हणतात. दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा मानली जाते. त्यामुळे अशा गणेशाची मूर्ती घरात ठेवू नये. फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणपती बाप्पाची मूर्ती ही घरी आणावी. अशा मूर्तीची पूजा करणे शुभ मानलं जातं.
गणपती बाप्पाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी ?
या गणेश चतुर्थीला तुम्हीही घरात गणपती बाप्पा बसवणार असाल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा. दिशा आणि कोनाच्या आधारे गणेशमूर्तीची स्थापना केल्यास तुमची पूजा नक्कीच फलदायी ठरु शकते. गणपतीची योग्य दिशेने स्थापना केल्यास आर्थिक समृद्धीची दारे देखील खुली होतात. ज्योतिषी सांगतात की, घराच्या ईशान्य कोपर्यात गणपतीची मूर्ती ठेवणे उत्तम. घराच्या पूर्व-उत्तर कोपऱ्याला ईशान्य कोपरा म्हणतात. या दिशेला तुम्ही निसंकोचपणे गणेश मूर्तीची स्थापना करू शकता. तर घराच्या दक्षिण दिशेला गणेश मूर्तीची स्थापना करू नये.
प्रतिष्ठापना मुहूर्त --
उद्या, 31 ऑगस्ट 2022 रोज बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4 वाजून 11 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 23 मिनिटांपर्यत तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करू शकतात.
या मंत्रांचा करा जप --
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात.
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश.
गणेश मूर्ती स्थापना विधी --
– गणपतीच्या मू्र्तीची स्थापना करताना सर्वप्रथम चौरंगावर गंगाजल शिंपडा आणि ते शुद्ध करा.
– चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्यावर अक्षता ठेवा.
– यानंतर श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर ठेवा.
– आता गणपतीला स्नान घाला आणि गंगाजल शिंपडा.
– मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी स्वरूपात सुपारी ठेवा.
– गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवा.
– दूर्वा आणि फळं, फूलं अर्पण करा.
– हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाची आरती करा.
– त्यानंतर गणेशजींच्या ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा.
अभिनंदन
ReplyDeleteधन्यवाद
DeletePost a Comment