दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सध्या भारतात ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ व्यतिरिक्त विविध राज्यांमध्ये राज्य मंडळाच्या परीक्षांचा स्तर वेगवेगळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनावरही मोठा फरक पडतो. या कारणामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन एकाच पातळीवर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे..
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘नीट’, ‘जेईई’, ‘सीयूईटी’ परीक्षांमध्ये काही बदल केले होते. त्यानंतर आता दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्येही मोठा बदल केला जाणार आहे. भारत सरकार सध्या त्याची तयारी करीत असल्याचे समजते..
विद्यार्थ्यांची होणार ‘पारख’..
देशभरातील दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये एकसमानता आणण्यासाठी, तसेच त्याद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन एकाच पातळीवर करण्यासाठी केंद्र सरकारने नव्या परीक्षा नियामक संस्थेची निर्मिती केली आहे. या संस्थेचे नाव आहे, ‘परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट.. अर्थात ‘पारख’ (PARAKH).
बोर्डाच्या परीक्षा एकसमान करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) विविध राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसोबत (एससीईआरटी) बैठका घेतल्या. त्यातून ‘पारख’ या नवीन मूल्यांकन नियामक संस्था पुढे आली..
‘एनसीईआरटी’चा एक भाग म्हणून ही संस्था (PARAKH) काम करील. तसेच, संस्थेवर ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे (SAS) आयोजित करण्याची जबाबदारीही असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (NEP) एक भाग म्हणून ही संस्था काम करणार असल्याचे सांगण्यात आले..
देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळांचा त्यात समावेश असून, या शाळांसाठी समान नियम, मानके, मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. 21 व्या शतकात विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यांचा विकास होईल, त्यांचे योग्य मूल्यमापन करता येईल, अशा प्रकारे मूल्यमापनाचा नमुना ठरवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वर्षातून दोन वेळा परीक्षा..?
दरम्यान, वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेण्याचा ‘एनईपी’चा प्रस्ताव असून, बहुतेक राज्यांचा त्याला पाठिंबा आहे. पैकी एका परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल. गणिताचे पेपर दोन प्रकारे देण्याचेही राज्यांनी मान्य केलंय. एक म्हणजे ‘स्टँडर्ड मॅथ्स’ आणि दुसरं म्हणजे ‘उच्चस्तरीय गणित’.. त्यामुळे मुलांमधील गणिताची भीती कमी होईल, असं सांगण्यात आलं.
إرسال تعليق