Khandesh Darpan 24x7

रेल्वे प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी, आता खिशाला बसणार आणखी झळ…!!

 रेल्वेचे ‘कन्फर्म’ तिकीट रद्द केल्यास, भारतीय रेल्वेकडून त्यावर ‘शुल्क’ आकारले जाते. मात्र, आता ‘कन्फर्म’ रेल्वे तिकीट रद्द करण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे. कारण, आता कन्फर्म रेल्वे तिकिट रद्द करणे अधिक महाग होणार आहे. कारण, रद्द केलेल्या तिकिट शुल्कावर आता वस्तू व सेवा कर.. अर्थात ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे..

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या टॅक्स रिसर्च युनिटने याबाबत 3 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, आता रेल्वे तिकीट रद्द केल्यास, तसेच हॉटेल बुकिंग रद्द करण्यावर ‘जीएसटी’ (GST) आकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

किती जीएसटी आकारणार..?

अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, रेल्वे तिकीट बूक करणे, म्हणजे एकप्रकारे एक करार आहे. यात सेवा पुरवठादार म्हणजे रेल्वे किंवा हॉटेलकडून ग्राहकांना सेवा प्रदान करण्याची ऑफर दिली जाते. मात्र, प्रवाशी तिकीट रद्द करून, हा करार संपुष्टात आणतात. अशा वेळी करार मोडल्याने प्रवाशांना रेल्वेला तिकिट (Railway tickets) रद्दीकरण शुल्क म्हणून, अल्प भरपाई द्यावी लागते.

आता तिकिट रद्दीकरण शुल्क हे करार रद्द करण्याच्या विरोधात दिलेले ‘पेमेंट’ आहे. त्यामुळे आता त्यावर ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे. कोणत्याही वर्गाच्या रेल्वे तिकिटावरील रद्दीकरण शुल्कावर त्या वर्गासाठी बूक केलेल्या तिकिटांप्रमाणेच ‘जीएसटी’ भरावा लागणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे..

रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी ‘कन्फर्म’ तिकीट रद्द केल्यास, एसी फर्स्ट क्लासवर 240 रुपये, एसी टियर-2 वर 200 रुपये, एसी टियर-3 व चेअर कारसाठी 180 रुपये, स्लीपर क्लासवर 120, तर द्वितीय श्रेणीच्या तिकिटांवर 60 रुपये तिकीट रद्द केल्याबद्दल शुल्क आकारले जाते.

ट्रेन सुटल्यानंतर 12 तासांत तिकीट रद्द केल्यास 25 टक्के तिकीट भाडे आकारले जाते. कन्फर्म तिकीट ट्रेन सुटल्यानंतर 4 तासांत रद्द केल्यास, भाड्याच्या 50 टक्के ‘कॅन्सलेशन चार्ज’ आकारला जातो.. प्रथम श्रेणी, एसी डब्याच्या तिकिटांच्या बुकिंगवर 5 टक्के ‘जीएसटी’ कर आकारला जातो. त्यामुळे या वर्गासाठी तिकीट रद्दीकरण शुल्कावरही 5 टक्के ‘जीएसटी’ शुल्क असेल.

Post a Comment

Previous Post Next Post