वाहन शौकिनांसाठी महत्वाची बातमी आहे. आपली गाडी इतरांपेक्षा वेगळी दिसावी, यासाठी अनेक जण ‘व्हीआयपी’ नंबर प्लेट खरेदी करतात. या नंबर प्लेटसाठी लाखो रुपये खर्च करण्याचीही या लोकांची तयारी असते. परिवहन विभागाकडून ‘व्हीआयपी नंबर प्लेट्स’चा लिलाव केला जातो. त्या माध्यमातून या विभागाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळताे..
अशा हौशी लोकांना आपल्या आवडत्या गाडीला हटके नंबर मिळवण्यासाठी आता आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य परिवहन विभागाने शुक्रवारी (ता. 16) राज्यातील कार व बाईकच्या ‘व्हीआयपी’ नंबरसाठी (Vip Vehicle Number) शुल्क वाढवण्याची मसूदा अधिसूचना जारी केली. मुख्य सचिव कार्यालयाने ही अधिसूचना राज्य सरकारकडे सादर केली आहे.
‘नंबर 1’साठी मोजा 5 लाख रुपये..
मसूदा अधिसूचनेनुसार, सर्वाधिक मागणी असलेला ‘नंबर 1’ आता अधिक महाग झालाय. चारचाकीला हा नंबर मिळवण्यासाठी आता प्रस्तावित शुल्क 5 लाख रुपये करण्यात आलंय.. सध्या हे शुल्क 4 लाख रुपये आहे. तसेच, दुचाकीसाठी ‘नंबर 1’ हवा असेल, तर नागरिकांना आता 50 हजार ते 1 लाखापर्यंत पैसे मोजावे लागणार आहेत.
मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड, औरंगाबाद, कोल्हापूर व नाशिकमध्ये ‘नंबर 1’ला सर्वाधिक मागणी असते. या नंबरसाठी आता नागरिकांना 5 लाख रुपये मोजावे लागतील. विशेष म्हणजे, ‘आऊट ऑफ सीरीज’ व्हीआयपी नंबर घ्यायचा असेल, तर त्यासाठी 18 लाखांहून अधिक रक्कम भरावी लागेल. नंबरच्या किंमतीत चांगली कार विकत घेता येऊ शकते..
या नंबरला सर्वाधिक मागणी…
महाराष्ट्रात प्रत्येक रजिस्ट्रेशन सीरीजमध्ये 240 वेगवेगळे नंबर ‘व्हीआयपी नंबर’ म्हणून रजिस्टर्ड आहेत. पैकी 0001, 0009, 0099, 0999, 9999 तसेच 0786 या नंबरला सर्वाधिक मागणी असते. या पाच नंबरसाठी सध्या दीड लाख रुपये शुल्क असून, आता ते अडीच लाख रुपये इतकं प्रस्तावित केलं आहे.
तसेच, तीन चाकी वाहनांसाठी प्रस्तावित शुल्क 20 हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत वाढवलं आहे. चारचाकी वा त्याहून अधिक चाकांच्या वाहनांसाठी प्रस्तावित शुल्क 70 हजारांहून 1 लाख रुपये करण्यात आलंय.
दरम्यान, ‘व्हीआयपी’ नंबर तुम्हाला जवळच्या नातेवाईकांस, म्हणजेच पती किंवा पत्नी, मुलगा आणि मुलीकडे हस्तांतरित करण्याची तरतूद मसुदा अधिसूचनेत केली आहे. सध्या ‘व्हीआयपी नंबर’च्या हस्तांतरणास परवानगी नाही. मात्र, आता तसे करता येणार असल्याची माहिती देण्यात आली..
Post a Comment