राज्यातील अंत्याेदय व केशरी शिधापत्रिका धारकांना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने फक्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली होती. फक्त 100 रुपयांत रेशनकार्डधारकांना एक लिटर पामतेल व प्रत्येकी एक किलो साखर, रवा व चणा डाळ, असे किट दिले जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते.
राज्य सरकारने या किटला ‘आनंदाचा शिधा’ असं नाव दिलं होतं. मात्र, दिवाळी तोंडावर आली, तरी राज्यातील रेशनकार्डधारकांना 100 रुपयांचा हा ‘आनंदाचा शिधा’ मिळालेला नाही. हे रेशनकार्डधारक दररोज दुकानदारांकडे जाऊन याबाबत विचारणा करीत होते. अखेर रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे..
आज पासून वाटप सुरु होणार --
राज्य सरकारमार्फत ‘आनंदाचा शिधा’चे किट विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आले असून, आज पासून (ता. 20) त्याचे वाटप सुरु होणार असल्याची माहिती मिळाली. या किटमध्ये चार वस्तू देण्यात येणार आहेत. या किटच्या पुड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असणार आहेत..
राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना, म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना ‘आनंदाचा शिधा’चा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता दिला जाणार असून, ई-पास प्रणालीद्धारे त्याचे वितरण केले जाणार आहे.. त्यासाठी सरकारी तिजोरीवर एकूण 486 कोटी 94 लाख रुपयांचा भार पडणार आहे.
राज्य सरकारच्या बॅग येण्यास उशीर झाल्याने शिधा वाटपाला विलंब झाला होता. त्यामुळे विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात होती. अखेर उद्यापासून (गुरुवारी) ‘आनंदाचा शिधा’ वाटप केले जाणार आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी किट पोचलेले नाही. त्यामुळे तेथील लाभार्थींना एक-दोन दिवस वाट पाहावी लागू शकते.
إرسال تعليق