Khandesh Darpan 24x7

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, अनुकंपा तत्वावरील भरतीबाबत मोठा निर्णय…!!


शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या वारसाची नियुक्ती करताना अनेकदा चालढकल केली जात होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या 10 ते 15 वर्षांपासून प्रलंबित राहिल्या होत्या. याबाबत सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता.

अखेर शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यायचे पद, हे मंजूर पद असल्याने, गुणवत्तेनुसार तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना दिला आहे.

प्रस्ताव नाकारता येणार नाही..

अनुकंपा तत्त्वावरील पदभरती ही नवी भरती नाही. संबंधित पद नव्याने निर्माण केले जात नाही. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रस्तावावर कार्यवाही करताना पदभरती बंदी किंवा आकृतीबंध निश्चित नसल्याच्या कारणास्तव प्रस्ताव अमान्य करता येणार नाही.

मानवतेच्या दृष्टिकोनातून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली जाते. मात्र, सरकारी निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव नाकारल्याचे उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. यापुढे तसं झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगासह, न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मृत कर्मचारी ज्या पदावर कार्यरत होता, त्या पदावर त्याचा वारस पात्र नसेल, तर त्यापेक्षा खालच्या पदावर त्यास समायोजित करावे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी अशी पदांच्या उपलब्धतेबाबत शहानिशा करून पात्र उमेदवारांना प्रतीक्षा यादीत समाविष्ट करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

एखादे व्यवस्थापनाने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवारास डावलल्याचे समोर आल्यास, शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करावी. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. न्यायालयाचा अवमान झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असे परिपत्रकात नमूद केलं आहे.

Post a Comment

أحدث أقدم