Khandesh Darpan 24x7

समरसता महाकुंभाच्या समारोप प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या कार्याचा गौरव



प्रतिनिधी :    प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी 

मानव जातीच्या कल्याणासाठी गायीचे पालन अनिवार्य


समरसता महाकुंभाच्या समारोप प्रसंगी अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविचलदासजी महाराज यांचे प्रतिपादन : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या कार्याचा गौरव


    आपल्या भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गाय आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ आणि वस्तू प्रदान करत असते. गाईच्या शेणापासून सीएनजी गॅस यासह विविध उपयोगी पदार्थांची निर्मिती केली जात आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने समरसता जोपासायची असेल आणि मानवजाती व जीवसृष्टीचे कल्याण करायचे असेल तर गाईचे पालन करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष परमपूज्य सप्तम कुबेराचार्य कैवल ज्ञानपीठाधीश्वर अविचलदासजी महाराज (सारसापुरी) यांनी केले. वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे सुरू असलेल्या सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

      

      यावेळी शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, ज्ञानदेवसिंहजी महाराज, ज्ञानेश्वरदासजी महाराज, परमानंदजी महाराज, रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज, रवींद्रपुरीजी महाराज, कमलनयनदासजी महाराज, बालकानंदगिरीजी महाराज, धर्मदेवगिरीजी महाराज, राजेंद्रदासजी महाराज, जितेंद्रानंदजी महाराज, चैतन्य महाराज देगलुरकर, धर्मदेवजी महाराज, प्रसाद महाराज अमळनेर यांच्यासह शेकडो संत महंतांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 

     अविचलदासजी महाराज म्हणाले की, विविध संप्रदायांचे संत महंत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून समरस्यतेचा संदेश देत आहे, ही बाब राष्ट्राच्या हिताची आहे. या सर्व संतांना राष्ट्राची चिंता असल्यामुळे सर्व एकत्र आले आहेत. आपल्या हाताची पाच बोटे असूनही त्यांची वेगवेगळी नावे व कामे आहेत. परंतु एक साथ आले तर शत्रूचा मुकाबला करता येतो. म्हणून राजकारण्यांनी सुद्धा राष्ट्राच्या हिताची गोष्ट केली पाहिजे. सुरक्षा व औषधी यावर आपला सर्वात जास्त खर्च होत असल्यामुळे गरिबी येत आहे. त्यामुळे प्राकृतिक चिकित्सावर भर दिल्यास औषधीवरील बजेट बंद होईल. त्यामुळे गाय चिकित्सा करणे गरजेचे आहे. 


    महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्षपद आम्ही देवून आमची योग्य निवड असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले असल्याचेही अविचलदासजी म्हणाले. 


    पार्थ चौधरी यांनी केलेल्या पेंटिंगचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन श्री राधे राधे बाबा यांनी तर आभार अत्यंत भावुक होऊन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सर्वांचे हृदयस्पर्शी, हृदयपूर्वक आभार मानले. 


    यावेळी सभामंडपात ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन, बऱ्हाणपूर मतदारसंघाचे खासदार, मध्यप्रदेशच्या माजी शिक्षणमंत्री अर्चना चिटणीस, आमदार शिरीष चौधरी, आमदार संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते. समर्थ महाकुंभाच्या तिसऱ्या दिवशीही हजारो भाविक उपस्थित होते.  लाखो भाविकांनी ब्रह्मभोजनाचा लाभ घेतला पोलीस प्रशासन, महावितरण कंपनी, पार्किंगची व्यवस्था व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले. 



महामंडलेश्वर जनार्दन हरीजी तीन वेळा भावुक - 


तीन दिवसीय समरसता महाकुंभात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज 

  • ब्रह्मलीन गुरूवर्य जगन्नाथ महाराज यांचे स्मरण, 
  • आई-वडिलांचा त्याग व समर्पणाची भूमिका आणि 
  • महाकुंभात अहोरात्र सेवा देणारे स्वयंसेवक

 यांच्याविषयी बोलताना भावुक झाले व त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. 


महाकुंभात वैद्यकीय उपचारावर भर - 


    समरसता महाकुंभामध्ये संजीवनी ब्लड सेंटर फैजपूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 305 रक्तदात्यांनी रक्तदान करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली सेवा दिली. 


    समरसता महाकुंभामध्ये ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते. 


त्यात गुजरात येथील डॉक्टरच्या टीमकडे 700 रूग्णांनी तपासणी करून औषधोपचार घेतले तर 


महाराष्ट्रीयन डॉक्टर टीम यांच्याकडे 1200 रूग्णांनी औषधोपचार घेतले. या महोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड वॅक्सिनेशन शिबिराचेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 66 जणांनी लसीकरण करून घेतले. 



महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज - 


        गायरान जमिनीवर मस्जिद अथवा मंदिर नाही तर गायींसाठी ती जमीन असावी, यासाठी पुढाकार घेण्याचे काम सध्या सुरू आहे. धरणगाव येथे गायरान जमिनीवर मस्जिद बनवण्यात येत होती. प्रशासनास निवेदन देऊन न्याय मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मूक मोर्चा काढण्यात आला. भीतीपोटी कोणी यायला तयार नव्हते. भारताचा पुत्र म्हणून मी देशसेवेसाठी समर्पित आहे. गायरानची जमीन खाली होत नसेल तर अखिल भारतीय संत समितीचे 180 आखाडे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


       गोहत्या बंद होऊन कत्तलखाने बंद करावे व त्यासंदर्भात कायदा करावा. गायींची तस्करी करणे बंद व्हावे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या गाड्या विनाकारण अडवल्या जातात. मात्र गाय भरलेली ट्रक अडवली जात नाही. गाय हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. 


        मुंबई, नाशिक, पुणे विभागात कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना खूप त्रास होत आहे. मंत्री महोदय नामदार गिरीश महाजन यांनी बैठक आयोजित करून मुख्यमंत्री यांना भेटून समस्या दूर करावी असे आवाहनही जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. त्यांनी शासन दरबारी काही मागण्या केल्या. अनधिकृत गोवंश वाहतूक बंद करावी, गोहत्या व कत्तलखाने बंद करावे, वर्षानुवर्षे गावोगावी असलेली गायरान जमीन ही मस्जिदच काय परंतु मंदिरासाठी पण कोणाला देऊ नये. ती फक्त आणि फक्त गायींसाठीच राखीव ठेवावी, असा कायदा शासनाने करावा, ही अखिल भारतीय संत समितीची मागणी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post