प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल
भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज
यांच्या नेतृत्वाखाली विशेष समरसता महाकुंभ दि. 29 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान वढोदे फैजपूर येथील निष्कलंक
धाम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा समरसता महाकुंभ आयोजित करण्यामागील
मुख्य हेतू सतपंथ मंदिर
संस्थानचा चतु:शताब्दी रौप्य महोत्सव साजरा करणे हा आहे.
जळगाव जिल्ह्यातील
फैजपूर येथील श्री सतपंथ मंदिर संस्थानची स्थापना इ.स. 1600 मध्ये झाली. पहिले गादीपती
आचार्य धर्मदासजी महाराज यांनी ज्योत प्रज्वलित केली. त्यानंतर प्रेमानंदजी महाराज, भगतरामजी महाराज, पंडितजी महाराज, अमृतजी महाराज, दगडूजी महाराज, झेंडूजी महाराज, बारसूजी महाराज, धर्माजी महाराज, पुरुषोत्तमजी महाराज
आणि जगन्नाथजी महाराज यांनी ही परंपरा अखंडित सुरू ठेवली असून सध्या विद्यमान बारावे गादीपती महामंडलेश्वर
जनार्दन हरीजी महाराज आहेत.
सर्व धर्मामध्ये
ज्योतीला मान्यता आहे. पृथ्वीची रचना तेजापासून झाली आहे. ब्रम्ह सत्य जगत मिथ्य असे म्हटले जाते. हे सत्य
ब्रह्म परमात्मा म्हणजे ज्योत होय. जेव्हा चराचर नव्हते तेव्हा फक्त तेज
होते. संपूर्ण ब्रह्मांडाच्या निर्मितीचे मूळ कारण तेज असून त्यापासून
सर्वसृष्टीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे तेजाची उपासना केली तरच विश्व
ब्रम्हांडाची आराधना होत असते. तसेच शरीराचे चैतन्य आत्मा असून हा आत्मा तेज स्वरूपाने
प्रत्येकात विराजमान आहे. हे तेज शाश्वत व सत्य असून ते निर्माणही झाले
नाही आणि त्याचा विनाशही होत नाही. अशा प्रकारची अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड
असलेली ही ज्योती श्री सतपंथ मंदिरात सुमारे 425 वर्षांपासून अखंडितपणे प्रज्वलित आहे.
या ज्योतीची देखभाल
करण्यासाठी सेवेकरी म्हणून मुखी आहेत. श्री सतपंथ मंदिरात कोणतीही मूर्ती नसून
फक्त ज्योत आहे. त्यामुळे मूर्तीचे ज्याप्रमाणे पूजा उपचार केले जातात, त्याचप्रमाणे
ज्योतीचे देखील पूजा उपचार केले जातात. ज्योत ही सगुण साकार व प्रगट देवता आहे.
सर्व देवी-देवतांचे मूळ स्वरूप ज्योत असून तीच चैतन्य शक्ती म्हणजेच तेज स्वरूप
परमात्मा आहे. त्यामुळे ज्योतीचे दर्शन केल्यावर प्रदक्षिणा करून फुल देखील अर्पण
करण्याचे काम या मंदिरात अखंडितपणे सुरू आहे.
या सतपंथ मंदिर संस्थान स्थापनेला 425 वर्ष पूर्ण झाले असल्याने चतु: शताब्दी रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. येत्या समरसता
महाकुंभात हा रौप्य महोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Post a Comment