प्रतिनिधी : प्रदीप कुळकर्णी | राजेश चौधरी
जळगावमध्ये नव्या वर्षाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आहे. 31 डिसेंबरनिमित्त जळगावमध्ये गोमूत्र प्राशन पार्टीचं (Gaumutra Party) आयोजन करण्यात आलं होतं.
आज 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2023 या नवीन वर्षाचं (New Year 2023) स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं या नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. कोणी दारु मटणाच्या पार्ट्या करतं तर कोणी देवदर्शनानं नवीन वर्षाचं स्वागत करतं.
मात्र, जळगावमध्ये नव्या वर्षाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आहे. 31 डिसेंबरनिमित्त जळगावमध्ये गोमूत्र प्राशन पार्टीचं (Gaumutra Party) आयोजन करण्यात आलं होतं. या अनोख्या पार्टीचं आयोजन जळगावमधील रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये करण्यात आलं होतं. तर नेमकी काय आहे ही संकल्पना याबाबतची माहिती पाहुयात...
31 डिसेंबर निमित्ताने अनेकजण दारु मटण खाऊन पार्टी करतात. मात्र यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. तसेच दारुचा शरीरावर दुष्परीणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळं दारु आणि मटणाच्या पार्टीचा दुष्परिणाम टाळण्यासाठी जळगाव मधील बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रातील गोभक्त दरवर्षी गोमूत्र पिऊन अनोख्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करतात.
यावर्षीही मोठ्या उत्साहाने या गोभक्तांनी गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. गोमूत्र नियमित पिण्याने आरोग्य उत्तम राहते. तसेच आयुष्य वाढते अशी या गो भक्तांची श्रद्धा आहे. शिवाय गोमूत्र पिण्यानं दारू पिण्याची इच्छा होत नाही. त्यामुळं दारू मटणापासून दूर राहण्याचा हा उत्तम पर्याय असल्याचं देखील आयोजकांनी सांगितले.
दारु पिण्यापेक्षा गोमूत्र पिणे कधीही चांगलं
मांस आणि दारू पिण्यापेक्षा गोमूत्र पिणे हे कधीही फायदेशीर आहे. या पार्टीच्या निमित्तानं आम्ही सर्व गो भक्त आपल्या कुटुंबासह एकत्र येऊन हा उपक्रम राबवत असतो. त्यामुळं कुटुंबासोबत असल्यानं एक वेगळा आनंदही आम्हाला मिळत असतो. नाहीतर दारू पिणारे कुटुंबाला सोडून एकटेच दारू प्यायला जात असतात. रस्त्यावर लोळतात त्यापेक्षा गोमूत्र पिणे हे कधीही चांगले असल्याचे गोमुत्र पार्टीत सहभागी झालेल्या पुष्पा पाटील यांनी दिली.
गोमूत्र पिल्यानं कोणतेही नुकसान होत नाही
नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकजण प्राण्यांना मारून त्यांचे भक्षण करतात. तसेच नवीन वर्षाचं स्वागत करताना दारू पितात. मात्र प्राण्यांचा जीव घेऊन आपला आनंद घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध असून हे टाळण्यासाठी आम्ही गोमूत्र पार्टीचे आयोजन करत असल्याचे मत गोमुत्र पार्टीत सहभागी झालेल्या आनंद भोलानकर यांनी व्यक्त केले.
दारू पिण्याने जेवढा आनंद मिळत नसेल त्यापेक्षाही जास्त आनंद आम्हाला या गोमूत्र पार्टीमधून मिळतो. गोमूत्र पिण्याने फायदे खूप होतात. दारु पिण्याचे तोटे अनेक आहेत. गोमूत्र पिल्याने कोणतेही नुकसान होत नाही. ते शरीरासाठी फायदेशीरच असल्याच्या प्रतिक्रिया गोभक्तांनी दिल्या आहेत.
إرسال تعليق