प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दिनांक ३ मे २०२३ रोजी च्या बहुतेक दैनिक पेपर मधील आलेल्या बातम्यानुसार तापी नदीवरील मुक्ताई धरणातून येणाऱ्या पाण्याचा साठा कमी होणार असल्याने सावदा शहरात पाणी पुरवठा दोन दिवसाआड करण्यात येईल असे म्हटलेले आहे.
सावदा शहरात शेतकरी व मजूर वर्ग तसेच केळी कामगार व हात मजुरी करणारे नागरिक खूप प्रमाणात आहेत. सदरील मजूर वर्ग हा गरीब परिस्थितीत असल्याने व त्यांचा रहिवास अत्यंत लहान लहान घरांमध्ये असल्याने दोन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा ते साठवू शकणार नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागेल यामुळे त्यांची मजुरी सुद्धा बुडणार आहे. या सर्व गोष्टींमुळे नागरिकांना होणारा मनस्ताप वजा त्रास कमी व्हावा या उद्देशाने आज नगरपालिका येथे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी निवेदन दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, हतनूर धरणातील पाणीपुरवठा आता होत असलेल्या निसर्ग बदलामुळे कमी होईल म्हणून दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येईल असे म्हणणे योग्य वाटत नाही. आपले म्हणणे आहे की बाष्पीभवन होऊन धरणातील पाणीसाठा कमी होईल परंतु आज पासून तर ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत नगरपालिकेने हतनूर धरणातून शहरासाठी पाणी पुरवण्याकरिता कितीही पाणी उचल केली तरी धरणातील पाण्याच्या साठ्याच्या १० टक्के सुद्धा पाणी कमी होणार नाही त्यामुळे आपण गावातील गरीब जनतेचा विचार करून शहराला होणारा पाणीपुरवठा नियमितपणे म्हणजे एक दिवसाआडच सुरू ठेवून सहकार्य करावे.
यापुढे म्हटले आहे की, आपण योग्य ते कार्यवाही करावी व गरीब जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा. तसे न झाल्यास जनतेसाठी आपल्या कार्यालयावर शांततेने किंवा इतर मार्गाने न्याय हक्कासाठी लढावे लागेल व होणाऱ्या परिणामास आपण प्रशासन जबाबदार राहील.
सदरहून निवेदन कार्यालय अधिक्षक सचिन चोळके व पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, अविनाश पाटील यांना दिले आहे.
Post a Comment