खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
गाडी पलटी झाल्यानंतर आम्ही काच फोडून बाहेर पडलो, पण तितक्यात आग वाढून स्फोट झाला. १५ मिनिटांत अग्निशमन दलाचं पथक आलं, पण तोपर्यंत गाडीचा कोळसा झाला होता, अशी माहिती समृद्धी महामार्ग अपघातातून वाचलेल्या योगेश गवई या तरूणाने दिली.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला आज (१ जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.
२५ जणांचा मृत्यू, ८ जण बचावले
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये ३३ प्रवासी होते. त्यामधील २५ प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले. इतर ८ प्रवासी अपघातातून बचावले.
अपघातातून वाचलेल्या प्रवाशांकडून पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेतला. बचावलेला प्रवासी योगेश गवई याने सांगितलं, “मी छत्रपती संभाजीनगरला उतरणार होतो. एका तासात माझा स्टॉप येईल म्हणून मी उतरण्याची तयारी सुरू केली होती. तितक्यात गाडी पलटी होऊन मी आणि माझा मित्र खाली पडलो. तितक्यात आमच्या समोरचा प्रवासी काच फोडून बाहेर निघत असल्याचं आम्ही पाहिलं आम्हीही त्याच्या मागे निघालो. गाडीवरून उडी मारून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर आल्यानंतर आमच्या मागेही काही प्रवासी आले. गाडी पलटी झाल्यानंतर लगेच आगीने पेट घेतला होता. पाहता पाहता आग वाढत गेली. प्रवाशांचा आक्रोश आम्ही ऐकला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. १५ मिनिटांत अग्निशमन दलाचं पथक आलं, पण तोपर्यंत गाडीचा कोळसा झाला होता,” असं गवई याने म्हटलं.
सदर खासगी बस (वाहन क्रमांक MH २९ BE १८१९) ही समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.
या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन ते फुटलं. दरम्यान, ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला. या आगीतच बहुतांश प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अपघातात वाचलेल्या प्रवाशांनी काच फोडून कसाबसा बाहेर प्रवेश मिळवल्याने त्यांना आपले प्राण वाचवता आले, अशी माहिती कडासने यांनी दिली.
अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये बसचा कोळसा झाल्याचं भीषण दृश्य फोटोंमधून पाहता येऊ शकतं
अपघात होण्यापूर्वी काही तास आधी कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. यानंतर पुढे बुलडाण्याजवळ बसला अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.
सदर बस ही विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीची होती. या कंपनीचे मालक विरेंद्र देर्ना यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२० मध्ये ही बस त्यांनी खरेदी केली होती.
ते म्हणाले, "ही बस नवीनच आहे. त्याची कागदपत्रेही अद्ययावत आहेत. त्याचा चालक दानिश हा सुद्धा अनुभवी आहे. दानिशच्या म्हणण्यानुसार, गाडीचा टायर फुटून अपघात झाला. त्यानंतर आग लागून गाडीतील ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतल्याने हा प्रकार घडला आहे."
प्रशासनाकडून ५ लाखांची मदत
दरम्यान, या अपघात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५
लाख
रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत ट्विट करून मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं, बुलढाणा
जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण
अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री ट्विट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती
घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय
खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असंही या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं.
तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे
घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले,
"विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा
जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय
धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
करतो."
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग बस अपघात प्रकरणी शोक व्यक्त केला. याविषयी पंतप्रधान म्हणाले, "बुलडाणा येथे झालेल्या भीषण बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं आहे. या अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनीही लवकर बरं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासनाकडून सर्व अपघात पीडितांना शक्य ती सगळी मदत केली जात आहे", असं मोदी म्हणाले.
प्रधानमंत्री ट्विट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तसंच, केंद्र सरकारमार्फत मृतांच्या नातेवाईंकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा मोदींकडून करण्यात आली आहे.
إرسال تعليق