खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
यंदा अधिकमास आल्याने आशाढानंतर अधिकमास आणि मग श्रावण महिना सुरु होणार आहे. हा अधिकमास फार पवित्र समजला जातो. याचे विशेष महत्व नवीन लग्न झालेल्या दांपत्यासाठी असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडील जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलावतात. त्यांना अधिकमासाचे वाण देतात.
पण या महिन्याच महत्व आणि जावयाचं महत्व काय आहे, जाणून घेऊया.
अधिकमास म्हणजे काय?
पृथ्वीचे सूर्या भोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य बारा राशीमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यात ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४७ सेकंद असतात. या काळात इंग्रजी कलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र चंद्राच्या पृथ्वी भोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चंद्रमास मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.
महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील हिंदू महिने हे अमावस्येला संपणारे असते. ज्या हिंदू मासात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही तो अधिकमास असतो.
सौरमास आणि चांद्रमास यांची सांगड घालण्यासाठी तसेच ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिकमासाची योजना करण्यात आली आहे. तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक क्षयमास आणि आधिकमास टाकून हि कालगणना सुर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
अधिकमासात ३३ आकड्याचे महत्व काय ?
वसिष्ठ सिद्धांतप्रमाणे अधिक महिना हा ३२ महिने १६ दिवस ८ तासांनंतर म्हणजे साधारण ३३ महिन्यांनंतर येतो. या ३३ महिन्यांसाठी म्हणून ३३ वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख तीस-तीन असा केला जातो. कारण महिना तीस दिवसांचा असतो. या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत ठेवतात. उ.दा. जर एकवेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे तीन दिवस दिवसातून दोन वेळा करून हे पुढील ३ दिवस भरून काढावे लागतात. ३३ ही संख्या अधिकमासामध्ये महत्वाची आहे. ३३ कोटी देव असल्याने ३३ हि संख्या महत्वाची आहे.
अधिकमासात जावयाला महत्व का?
अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात.त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो.
घोषणा : सदर लेख फक्त सामान्य माहिती साठी आहे. खान्देश दर्पण 24x7 अश्या कोणत्याही गोष्टींना पाठींबा देत नाही. अधिक माहिती वा तपशीलासाठी आपण तज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Post a Comment