खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री पक्षप्रमुख राज ठाकरे व पुत्र अमित दिल्लीला विशेष विमानाने गेले. मंगळवारी सकाळी अमित शाह यांच्या निवासस्थानी फक्त राज व शाह यांंच्यात ४० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. त्यानंतर लगेच ठाकरे पिता-पुत्र मुंबईत परतले. आपल्या निवासस्थानी राज यांनी बाळा नांदगावकर, अविनाश जाधव अशा काही मोजक्या सहकाऱ्यांशीच चर्चा केली. दिल्लीतील चर्चेच्या तपशिलाबाबत राज ठाकरेंनी बाहेर कुणाशीही वाच्यता केली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी शाह यांच्यापुढे तीन प्रस्ताव मांडले आहेत. पहिला म्हणजे लोकसभेला किमान दोन जागा द्याव्या. विधानसभा व मुंबई मनपा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला किती जागा येतील हेही अाताच ठरवून त्याचा लेखी करार करा,’ अशी मागणी राज यांनी केली. त्यावर राज्यातील नेत्यांशी बोलून ठरवू, असे शाह यांनी त्यांना सांगितले. दरम्यान, युतीबाबत २ ते ४ दिवसांत सकारात्मक निर्णय होऊ शकताे.
फडणवीसांच्या अनुपस्थितीत चर्चा
भाजप श्रेष्ठींच्या निमंत्रणावरून राज सोमवारी रात्री १० वाजता दिल्लीत पोहोचले. रात्रीच अमित शाहांशी चर्चा होणार होती. पण ती झाली नाही. त्यामुळे राज यांना मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस मुंबईतच होते.
कुणाला काय फायदा होणार?
भाजपला मिळेल हिंदुत्ववादी चेहरा
राज ठाकरेंचा हिंदुत्ववादी चेहरा, मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख याचा मुंबईत फायदा घेणार.
मुंबईत उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे. तिथे मनसेचा उमेदवार देऊन मतविभाजनाचा डाव.
मनसेला २०१९ च्या विधानसभेत २.५ % मतदान होते. ही मराठी मतेही खेचून आणायची.
उद्धव यांच्याशी युती तुटली तरी खरी शिवसेना (शिंदे) व अजून एक ठाकरे (राज) महायुतीत आहे हा संदेश मराठी माणसांवर ठसवायचा.
दोन पक्ष, घराण्यांना झुंजवून भाजपची शत-प्रतिशत खेळी
देशभर मोटी लाट असूनही भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. प्रादेशिक पक्ष सक्षम असल्याने युती, आघाडीशिवाय इथे राज्य करणे अवघड असल्याची खात्री पटल्याने २०२२ पासून भाजपने या राज्यात ‘तोडा-फोडा’ हे राजकीय डावपेच सुरू केले. आधी शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंकडून पक्ष काढून घेत अडीच वर्षांतच भाजपने पुन्हा सत्ता मिळवली. नंतर अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत तोच ‘प्रयोग’ यशस्वी करून दाखवला. मात्र एवढ्यावरच भाजपचे डावपेच थांबलेले नाहीत.
आता कुटुंबांत फोडाफोडीचे राजकारण
‘शतप्रतिशत भाजप’ हे उद्दिष्ट ठेवून भाजपने पक्षफुटीने आधीच गलितगात्र झालेल्या नेत्यांच्या घरात दुहीचे बीजे पेरण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी ‘महाशक्ती’च्या जोरावर बारामतीतून बहीण सुप्रियाविरोधात पत्नी सुनेत्रा यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. बारामतीत कुणीही हरले तरी पराभव ‘पवारांचा’च होणार. भाजपचे हेच उद्दिष्ट आहे. २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ द्वारे मोदींच्या घोषणांचे वाभाडे काढणाऱ्या राज ठाकरेंंसाठी भाजपने आता पायघड्या घातल्या. राज यांच्या माध्यमातून उद्धवांना नामोहरम करण्याचे त्यांचे डावपेच आहेत. पुढील निवडणुकीपर्यंत सर्व प्रादेशिक पक्षांना आपसात झुंजवून संपवायचे व नंतर अनभिषिक्त सम्राटासारखे शत-प्रतिशत आपलीच सत्ता गाजवायची, अशी भाजपची खेळी दिसून येते.
मनसेचे ३ प्रस्ताव
मुंबई महापालिकेचे जागावाटप ठरवून सर्वांची लेखी हमी द्या
विधानसभेलाही महायुतीतून ४० ते ५० जागा सोडाव्यात
लोकसभेला दक्षिण मुंबई, शिर्डी, नाशिक यापैकी २ जागा द्याव्या
मनसेला मिळतील आमदार, खासदार
मनसेचा सध्या एकही खासदार नाही, आमदार फक्त एकच आहे. भाजपच्या मदतीने त्यांचा एक खासदार व काही आमदार निवडून येतील.
मुंबई मनपा निवडणुकीत गेल्या वेळी फक्त ७ नगरसेवक होते. ती संख्याही वाढून सत्तेचा लाभ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकेल.
मुंबईबाहेर नाशिक, पुणे, मराठवाड्यातही पक्ष वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.
कोहिनूर मिल प्रकरणात राज यांना ईडीची नोटीस आली होती. ती चौकशी टळू शकेल.
अतुल लोंढे, प्रवक्ता, काँग्रेस पक्ष
एकेकाळी उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या- काठ्यांनी मारणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेणारा भाजप आता या मतदारांना कोणत्या तोंडाने मते मागणार? भाजपने उत्तर भारतीयांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून स्वाभिमानाला धक्का लावला आहे.
उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सेना
महाराष्ट्रात मोदी या नावाने मते मिळणार नाहीत तर ठाकरेंच्या नावानेच मत मिळतात, हे त्यांना आता समजले आहे. म्हणून आधी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चोरला. त्याने काही फरक पडत नाही. मग आता आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. घेऊन जाऊ द्या.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/bjps-raj-marg-for-mission-45-union-minister-amit-shah-raj-thackeray-discuss-40-minutes-in-delhi-132749118.html
إرسال تعليق