प्रतिनिधी | शहादा
सन्मार्गाने चालत राहिलो तर अडचणी आपोआप दूर होतात. विद्यार्थी दशेपासूनच आपण चांगल्या मार्गाने वाटचाल करीत राहा, यश निश्चित प्राप्त होईल, असे प्रतिपादन पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी केले.
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन तर्फे आयोजित अण्णासाहेब पी. के. पाटील स्मृती आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी मंचावर निवृत्त सहसंचालक विरसिंग पाडवी, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक के. डी. पाटील, मंडळाचे संचालक मयूर पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीबेन पाटील, वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील यांच्यासह परीक्षक प्रा. डॉ. जसपालसिंह सिसोदिया, प्रा. डॉ. विजय पालवे, विविध विद्या शाखांचे प्राचार्यांची उपस्थिती होती.
बापूसाहेब दीपकभाई पाटील म्हणाले, व्यक्तीला जशी बुध्दी व शक्ती प्राप्त होते तशा प्रकारे ती वागत असते. स्वर्गीय अण्णासाहेब यांचे अगणित पैलू आहेत. त्यांची कार्यशैली अनोखी होती. आपल्या पिढीला प्रेरणा देणारी किमया त्यांच्या ठायी होती.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. चंद्रशेखर सुतार यांनी केले. आभार प्रा. मनोज चौधरी यांनी मानले. दरम्यान,मंडळाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आंतर महाविद्यालयीन विभागीय (नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा) पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेत १७ महाविद्यालयातील ३४ स्पर्धक सहभागी झाले.
वक्तृत्व स्पर्धेचे विषय माझा गाव माझी जबाबदारी, आजची आत्मनिर्भर स्त्री, वाचन संस्कृतीचे भविष्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, नैसर्गिक व रासायनिक शेती हे होते.
प्रथम पारितोषिक १०,०००० रुपये स्पर्धक (पाच हजार) व महाविद्यालय (पाच हजार),
द्वितीय पारितोषिक ७,००० रुपये स्पर्धक (तीन हजार पाचशे) व महाविद्यालय (तीन हजार पाचशे),
तृतीय पारितोषिक ५,००० स्पर्धक (दोन हजार पाचशे) व महाविद्यालय (दोन हजार पाचशे)
तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी रु. १,००० चे होते.
निकाल खालील प्रमाणे:
प्रथम- अनुष्का सचिन विसपुते, आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, शिरपूर,
द्वितीय- खुशी नंदेश परदेशी, आर. सी. पटेल कॉलेज ऑफ फार्मसी, शिरपूर,
तृतीय- पार्थ अभय शेळके, कृषी महाविद्यालय धुळे,
उत्तेजनार्थ- गणेश दीपक गिरासे, कॉलेज ऑफ फार्मसी शहादा व पायल देविदास चव्हाण, आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज, नवापूर.
स्पर्धा संपल्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती कमलताई पाटील, सौ. जयश्रीबेन पाटील, सौ. माधवीबेन पाटील, मयूर पाटील, प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल आदी उपस्थित होते.
फाउंडेशनचे सचिव तथा महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील व मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समिती सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
आणि
Post a Comment