प्रतिनिधी | थोरगव्हाण
लहानसं गाव असलं तरी गणेशोत्सवाचं धाडस आणि जल्लोष मात्र मोठा. थोरगव्हाण गावात काल 'कालभैरव मंडळचा राजा' गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. गावातील लोकसंख्या कमी असली तरी उत्सवात कोणतीही कमतरता नव्हती. स्त्री-पुरुष, लहान-मोठे सगळेच भक्तगण या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले.
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणपती सोहळ्याची सांगता गणपतीच्या विसर्जनाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत गणेशभक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मिरवणुकीत ढोल वाजणारे तरुण, आकर्षक गणेश मूर्ती, आणि भक्तांच्या जयघोषांनी आसमंत दणाणून गेला. महिलांनी व पुरुषांनी पारंपारिक पोशाखात दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.
विशेषतः कालभैरव मंदिराजवळ झालेला गरबा नृत्य हा सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला. विविध रंगांचे दिवे, आनंदी चेहऱ्यांवरून दिसणारा उत्साह, आणि गणेशाच्या जयघोषांनी तेथील वातावरण अत्यंत पवित्र आणि उत्साही बनवलं होतं.
अनेक भक्तांनी बाप्पाला निरोप देताना डोळ्यात अश्रू आणले. "विघ्नहर्ता" गणपती बाप्पाने आपल्या गावातून सर्व विघ्न दूर करावीत, अशी प्रार्थना करत त्यांनी बाप्पाला निरोप दिला. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी गणपती बाप्पाच्या पुढील वर्षी लवकर येण्याची आशा व्यक्त केली.
Post a Comment