प्रतिनिधी | थोरगव्हाण
थोरगव्हाण येथील शालेय गणपती उत्सव २०२४ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन प्रेरणा देण्यासाठी या उत्सवात विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाटक, संगीत, गट नृत्य, एकपात्री प्रयोग, भजन, सिनेगाणी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीबाबत व्याख्यान, पारंपरिक व सांस्कृतिक नाटकांचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या पूर्ण सहभागासाठी मोबाईल जमा करण्यात आले होते, जेणेकरून विद्यार्थी कार्यक्रमात संपूर्णपणे गुंतू शकतील.
कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला. या वर्षीचा गणपती उत्सव अधिक खास ठरला कारण शाळेची स्थापना १९१७ मध्ये झाली असता या वर्षी शाळेने १०७ वर्षे पूर्ण केलीत. शाळेच्या भिंतींनी अनेक पिढ्यांना घडवलं आहे, आणि या ऐतिहासिक उत्सवात विद्यार्थ्यांनी तब्बल ५२ कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११:३० वाजेला होऊन सांगता दुपारी ३ वाजता झाली. या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणांची कसून तपासणी करण्यासाठी चार परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
कार्यक्रमात देवांशु राहुल कोळी, पुरवेश दानराज पाटील, सुषील पाटील, ममता आदींनी सहभाग घेतला होता. या सर्वात भावनिक क्षण फाल्गुनी धनगर या ११ वीच्या विद्यार्थिनीच्या नृत्यात दिसला. ती ऐकू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, परंतु तिने संगीताच्या तालावर ज्या प्रकारे अप्रतिम नृत्य सादर केले ते सर्वांसाठी प्रेरणादायी होते. गेल्या अनेक दशकांपासून हा कार्यक्रम शाळेच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संचालक दिनेश पाटील, उपाध्यक्ष उमाकांत बाउस्कर, संचालक मधुकर कोल्हे, मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव, माजी संचालक प्रविण पाटील, पालक शिक्षक समिती उपाध्यक्ष संतोष राणे, सह सचिव विजय चौधरी, पर्यवेक्षक डी. के. पाटील, मनोरंजन समिती प्रमुख पी.सी. कचरे यांनी परिश्रम घेतले.
आणि
Post a Comment