यंदा १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी महालयारंभ होत आहे; हा काळ निवडण्यामागील शास्त्रार्थ जाणून घेऊ या.
आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी, खूप अभ्यास करून पूर्वजांनी, ऋषि मुनींनी आखून दिलेले आहेत. म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे. अगदी सण, वार, उत्सव देखील निसर्गाशी संबंधित वातावरणाशी निगडीत आखलेले आहेत. इतके सुंदर आखीव रेखीव कालनिर्णय जगाच्या पाठीवर कुठेच दिसणार नाही. ही आहे आपली हिंदू संस्कृती आणि संस्कार. यंदा १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी महालयारंभ अर्थात पितृपक्षाचा काळ सुरू होत आहे; हा काळ निवडण्यामागील शास्त्रार्थ जाणून घेऊ या. --- आता बघा ना श्रावण उपास तापसांचा, भजन पूजनाचा गेला, त्यामागोमाग आपले गणराज आले आले काय आणि गेले गेले काय ! आणि आता ‘श्रद्धा’ पूर्ण होते न होते तोच केवळ एका कानाच्या फरकाने ‘श्राद्ध’सुरू झाले. परंतु, हे पंधरा दिवस श्राद्धासाठी राखीव का ठेवले असावेत, यामागचे शास्त्रीय कारण जाणून घेऊ.
पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा, भाद्रपद वद्य पक्ष व महालय असे शब्द आपण वापरतो. महालयाकरिता भाद्रपद पक्षच का निवडला, याचे कारण फार पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपदाअखेर वर्ष समाप्त होत असे. वर्षाच्या शेवटी सर्व पितरांच्या तृप्तीकरिता एक महालय श्राद्ध करण्याची चाल उत्पन्न झाली. हे कृत्य विशेषत: कृतज्ञता बुद्धीने केले जाते.
स्वर्गात सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र, असा काळ असतो. त्यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायण असे म्हणतो. भाद्रपद महिन्यात आपण महालय श्राद्ध करतो, ती दक्षिणायनात करतो. दक्षिणायन म्हणजे स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस. स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून, पितृलोक दक्षिणेकडे आहे. त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो. पितरांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले, तर दक्षिणायनातच केले जाते. म्हणून आताच्या सणवारानुसार गणपती आणि नवरात्र या दरम्यान पितृपक्षाचा काळ राखीव ठेवला जातो.
ज्याप्रमाणे सुख दु:खाचा फेरा सुरू असतो, त्याप्रमाणे सण वार उत्सव यांमुळे निसर्गात, समाजात, मानवात चैतन्याची लाट पुन्हा पुन्हा उसळत राहावी, यासाठी धर्मशास्त्राने केलेली ही सुंदर आखणी आहे. श्राद्धकाळ झाला, की मनावर आलेले मळभ दूर होऊन नवरात्रीची घटस्थापना होते. गरबा रंगतो. दसरा साजरा होतो आणि दिवळीची तयारी सुरू होते. अशा या आनंदात आपल्या पितरांचे स्मरण राहावे यासाठी हा पितृपक्षाचा काळ आहे, तोही आपण सेवाभावी वृत्तीनेच पार पाडला पाहिजे.
Post a Comment