Khandesh Darpan 24x7

मराठी नववर्ष प्रारंभ तथा गुढीपाडवा महात्म्य


खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -  


गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. 


या दिवशी नवीन वस्तू खरेदीव्यवसाय प्रारंभनव उपक्रमांचा प्रारंभसुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.


गुढीपाडवा – सांस्कृतिक इतिहास


👉ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.


👉श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.


👉शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.


प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. 


आरोग्यदृष्ट्या महत्त्व


चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवामीठहिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणेधान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.



गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप


👉 चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.


👉गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते.

👉 गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात.


👉गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात.


👉गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात.


👉 निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात.


👉संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.


आमच्या सर्व वाचकांना मराठी नववर्ष तसेच गुढीपाडवा च्या मन:पूर्वक हार्दिक शुभेछ्या . 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم