निंभोरा प्रतिनिधी
सिंगनूर (ता. रावेर) येथील सागर पाटील याची सैन्यदलात अग्नी वीर म्हणून निवड झाली. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तो बुधवारी गावी आला. यावेळी ग्रामस्थांनी मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले.
इंडियन आर्मी अंतर्गत अग्नि वीर योजनेमार्फत भरती निघाली होती. त्यात सिंगनूर येथील सागर भास्कर पाटील (वय १९) याची निवड झाली होती. त्याने हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर सागर पाटील ९ ऑगस्टला गावी सिंगनूर येथे आला. संपूर्ण गावात मिरवणूक काढून त्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अशोक कोळी, अरमान शाह फकीर, अनिल तायडे, रेखा चौधरी, पांडुरंग महाजन आदी उपस्थित होते. सागर पाटील याचे अनेकांनी औक्षण केले.
सागर पाटील यांचे आई-वडील हे मोलमजुरी करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्याचे शिक्षण पूर्ण केले. ग्रामस्थांनी वाजतगाजत केलेले स्वागत अनोखे आहे.
देशसेवा व देशप्रेम अंतिम श्वासापर्यंत कायम ठेवेल असे सागर म्हणाला.
إرسال تعليق