खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
मध्ययुगीन अरब भूगोलतज्ज्ञ अल-मुकद्दसी यांनी जेरुसलेमला “विंचवांनी भरलेली सोन्याची वाटी” म्हटले होते. पवित्र शहरांपैकी सर्वात पवित्र आणि तरीही त्यापैकी सर्वात रक्तरंजित जेरुसलेम हे जगातील सर्वात वादग्रस्त शहर ठरले आहे. पहिले महायुद्ध संपल्यानंतर जेरुसलेमची पॅलेस्टिनी आणि इस्रायलमध्ये फाळणी झाली.
सहा दिवसांच्या अरब-इस्त्रायली युद्धानंतर, पूर्व जेरुसलेम इस्रायलमध्ये विलीन झाले, त्यावेळेस जवळपास दोन लाख 'ज्यू' या भागात स्थायिक झाले, तेव्हापासून परिस्थिती अशीच होती. असे असले तरी हा वाद ५०-७५ वर्षे जुना नसून त्याचा इतिहास किमान दोन हजार वर्षांचा आहे.
या प्रदेशातील वेगवेगळ्या धार्मिक समुदायांनी नेहमीच या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, किंबहुना करत आहेत. आणि त्यातूनच हा भूभाग चिरंतर वादाच्या-युद्धाच्या भोवऱ्यात अडकल्याचे लक्षात येते.
जगातील वेगवेगळ्या धर्मांचे तौलनिक अभ्यासक कॅरेन आर्मस्ट्राँग यांनी ‘जेरुसलेम-वन सिटी, थ्री फेथ’ या त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, “प्राचीन काळात जगभरातील विविध धर्मांमध्ये श्रद्धेच्या प्रकटीकरणासाठी विकसित झालेले ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. जेरुसलेम हे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मुख्यत्त्वे जेरुसलेम हे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठीचे पवित्र स्थान आहे. यामुळेच या तीनही धर्माच्या अनुयायांना या शहराकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे खूप कठीण होते, कारण ते त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेशी आणि अंतिम वास्तवाशी बांधले गेले आहेत- ज्याला कधीकधी ‘देव’ किंवा पवित्र असे म्हटले जाते.”
कॅरेन आर्मस्ट्राँग म्हणतात, ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम यातील प्रत्येक धर्म जेरुसलेमशी संबंधित आहे, हा पवित्र संबंध भूतकाळातील पौराणिक किंवा ऐतिहासिक संदर्भांद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो. बायबल मधील संदर्भांनुसार अब्राहमने आपल्या मुलाचे बलिदान देण्याची तयारी केली होती, ते ठिकाण म्हणजे जेरुसलेम आणि याच ठिकाणी येशू आपल्या शिष्यानां भेटला होता आणि त्यानंतर या शहराजवळील एका ठिकाणी त्याला वधस्तंभावर चढविण्यात आले.
इस्लामिक मान्यतेनुसार याच ठिकाणाहून प्रेषित मुहम्मद हे रात्री स्वर्गाच्या दिशेने प्रवासाला निघाले (प्रेषित मुहम्मद यांनी मक्केमधील (मस्जिद अल-हरम) Masjid al-Haram मशिदीपासून जेरुसलेम मधील टेंपल माउंटपर्यंत बुराक नावाच्या पंख असलेल्या घोड्यासदृश प्राण्यावरून प्रवास केला, त्यानंतर ते स्वर्गाच्या दिशेने निघाले). प्रोफेसर सायमन गोल्डहिल यांनी म्हटल्याप्रमाणे या भागाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्याने त्या भागावरून सतत वाद होताना दिसतात.
ज्यूंचे पवित्र शहर
हे शहर सध्याच्या दक्षिण लेव्हंटशी संबंधित होते. बायबलमधील संदर्भानुसार इसवी सन पूर्व १२५० मध्ये, मोझेसच्या नेतृत्वाखाली १२ जमाती इजिप्तमधून पळून गेल्या आणि सिनाई द्वीपकल्पाजवळ भटके जीवन जगू लागल्या. त्यांना खात्री होती की त्यांच्या देवाने त्यांना कनानच्या सुपीक भूमीचे वचन दिले होते.
मोशेचा मुलगा जोशुआच्या नेतृत्वाखाली या जमातींनी कनानमध्ये घुसखोरी केली आणि देवाच्या नावाने हा प्रदेश आपला केला. तरीही जेरुसलेमचे मूळ रहिवासी समजल्या जाणाऱ्या जेबूसी लोकांना ते घालवू शकले नव्हते. इसवी सन १००० मध्ये डेव्हिडच्या शासकांच्या अधिपत्याखाली जेरुसलेम इस्राएलची राजधानी आणि ज्यू परंपरांचे केंद्र झाले. तरीही त्यांनी त्या ठिकाणच्या स्थानिक धार्मिक परंपरांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला नाही, याची नोंद धर्माच्या इतिहासकारांनी घेतली आहे.
जेरुसलेममधील मूर्तिपूजक विधींची अनेक चिन्हे अलगद ज्यू धार्मिक परंपरांचा भाग झाली. तरीही येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ती म्हणजे बायबलमध्ये दिलेले संदर्भ हे वास्तविक घटना घडून गेल्यावर हजार वर्षांनी लिहिले गेले आहेत. हे विशेषतः अब्राहम, आयझॅक आणि जेकब सारख्या पात्रांच्या आसपासच्या कथांबद्दल खरे आहे, इस्रायलचे हे तीन कुलपिता कालांतराने यहुदी/ ज्यू परिचयाचे सर्वात मजबूत घटक ठरले.
“बायबलसंबंधी लेखकांना एकोणिसाव्या आणि अठराव्या शतकातील कनानमधील जीवनाबद्दल काहीही माहिती नव्हती, परंतु यात आलेल्या कुलपित्याच्या कथा महत्त्वाच्या आहेत, कारण त्यामुळे इस्राएली लोकांनी स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करायला सुरुवात केली याचा उलगडा होतो.” असे आर्मस्ट्राँग नमूद करतात.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
إرسال تعليق