Khandesh Darpan 24x7

शाळांच्या वेळा बदलणारच? विधानसभेच्या चर्चेत आला मुद्दा

मागील आठवडाभरापासून राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच आज हा विषय थेट विधानसभेत चर्चेला आला.


खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिलेल्या राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भातील सल्ल्याशी संबंधित विषय चर्चेला आला. मागील आठवड्यामध्ये राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीचा संदर्भ देत शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. याचसंदर्भातून आज राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हा विषय विधानसभेमध्ये उपस्थित केला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सरकारला सूचनाही केली आहे.



राज्यपाल काय म्हणाले होते?


5 डिसेंबर रोजी राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिलेल्या भाषणात राज्यपालांनी शालेय विद्यार्थ्यांवर ताण दूर करण्याच्या दृष्टीने आपली मतं मांडली. 


राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला शाळांच्या वेळेसंदर्भात सूचना केल्या होत्या. "बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्या झोपेच्या वेळा बदलल्यात. मध्यरात्रीपर्यंत मुलं जागीच असतात. मात्र शाळांसाठी मुलांना लवकर उठावं लागतं. त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही. मुलांना चांगली झोप मिळावी या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच शाळांच्या वेळा बदलण्याबद्दल विचार करायला हवा," असं बैस यांनी म्हटलं. 


"ई-वर्गांना चालना देणं गरजेचं आहे. यामध्यमातून मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळेचा विचार करता येईल. गुणवत्तेनुसार शाळांना श्रेणी द्याव्यात आणि यापैकी सर्वोत्तम शाळांना बक्षिसे द्यावीत. या माध्यमातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा निर्माण होईल,’ असं बैस यांनी नमूद केलं.


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



विधानसभेत काय झालं?


शालेय वेळेत बदल करावे हा मुद्दा विधानसभेमध्ये चर्चेत आला. विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांकडे लक्ष वेधून घेतलं. विरोधीपक्ष नेत्यांनी हा विषय मांडल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी, "शासनाने लवकरच भूमिका स्पष्ट करावी. हा विषय महत्वाचा आहे," असं म्हणत सरकारला सूचना केली.


इतर विषयांवरही होणार का चर्चा?


राज्यपालांनी शाळांच्या वेळांसंदर्भात दिलेल्या सल्ल्यावरुन विधानसभेत चर्चा झाली असली तरी इतर मुद्द्यांवर चर्चा होणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कमी गृहपाठ द्यावा असंही राज्यपाल बैस यांनी सुचवलं होतं.  "शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना कमी गृहपाठ कमी देण्याकडे शिक्षकांचा कल हवा. त्याचप्रमाणे खेळ व इतर कृतिशील उपक्रमांवरही शिक्षकांनी भर द्यायला हवा,’ अशा सूचनाही बैस यांनी केल्या. आधुनिक आव्हानांसंदर्भात भाष्य करताना बैस यांनी, ‘सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी शाळांमध्ये व्याख्याने व सत्रांचे आयोजन केले जावे,’ असं म्हटलं होतं. आता यावरही सरकार काही निर्णय घेणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Zee 24 Tass -Updated: Dec 13, 2023, 01:09 PM IST


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

أحدث أقدم