प्रतिनिधी : राज चौधरी | प्रदीप कुळकर्णी
जळगाव जिल्ह्यात महायुतीला मोठे यश आले आहे. जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सुरेश जैन यांनी नुकताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आपण कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचे सुरेश जैन त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात चांगले काम करत असून त्यांच्या कामामुळे आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे सुरेश जैन यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान जळगाव मधील भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी जैन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर सुरेश जैन यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आपल्या आरोग्याच्या कारणासाठी सुरेश जैन मागील अनेक दिवसांपासून मुंबईतच होते. मात्र, ते आता जळगाव मध्ये दाखल झाले असून या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर जैन यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले आहे.
विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा त्यांनी नुसताच राजीनामा दिला आहे. सुरेश जैन यांना जळगाव शहरांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवारांची ताकद देखील वाढली असल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्यास मात्र नकार
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश जैन कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याची चर्चा रंगली होती. मंत्री गिरीश महाजन त्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सुरेश जैन यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या बॅनरवर माझे फोटो लावले आहेत, ते फोटो देखील यापुढे न वापरण्याची विनंती त्यांनी उद्धव ठाकरे गटाला केली आहे.
إرسال تعليق